गुन्हेजळगाव

जेवण न दिल्याच्या रागातून मुलाकडून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या

जेवण न दिल्याच्या रागातून मुलाकडून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या

येवती येथील घटना; मद्यधुंद मुलाने लोणच्याची बरणी, विळा आणि लोखंडी दाताळ्याने केले वार

जळगाव प्रतिनिधी : आईने जेवण दिले नाही, या क्षुल्लक कारणावरून मद्यधुंद मुलाने जन्मदात्या आईशी वाद घालत तिच्या डोक्यावर लोणच्याची बरणी मारली. त्यानंतर विळा आणि लोखंडी दाताळ्याने वार करून आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आली. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय ६३) असे मृत महिलेचे नाव असून, गणेश पुरुषोत्तम वाघ असे संशयित मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पतीच्या निधनानंतर आई-मुलगा राहत होते एकत्र

येवती येथे पत्र्याच्या घरात अलकाबाई वाघ या आपला मुलगा गणेश याच्यासोबत राहत होत्या. त्यांचे पती पुरुषोत्तम वाघ यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना तीन मुली असून, तिघींचेही विवाह झाले आहेत. त्यामुळे घरात अलकाबाई आणि गणेश असे दोघेच राहत होते.

गणेशचे यापूर्वी दोन विवाह झाले होते. मात्र, त्याला दारू आणि गांजाचे व्यसन असल्याने एका पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिली, तर दुसरी पत्नीही त्याच्यासोबत राहत नसल्याची माहिती समोर आली आहे.

बहिणीला फोन करून दिली घटनेची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास गणेशने मध्य प्रदेशातील इच्छापूर येथे राहणाऱ्या आपल्या मोठ्या बहिणीला फोन केला. आईने जेवण दिले नाही, म्हणून आपण तिला मारल्याचे त्याने बहिणीला सांगितले. ही माहिती मिळताच बहिणीने आपल्या मुलाला, आकाश महाजन याला घटनेची माहिती दिली.

आजीच्या घरासमोर जमलेली होती गर्दी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आकाश महाजन आणि त्याचा मेहुणा जामनेर तालुक्यातील पाटखेडा येथून पहाटे सुमारे पाच वाजता येवती येथे पोहोचले. त्यावेळी अलकाबाई यांच्या घरासमोर नागरिकांची गर्दी जमली होती. घरात अलकाबाई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या होत्या. त्यांच्या अंगावर गोधडी टाकलेली होती, तर गणेश घरातच बसलेला होता.

यावेळी गणेशने आपला भाचा आकाश याला आईने जेवण दिले नाही, म्हणून तिला मारून टाकल्याचे सांगितल्याची माहिती आहे. या प्रकरणी आकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारूविक्री रोखण्याची ग्रामस्थांची मागणी

येवती परिसरात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जामठी येथेही अवैध दारूची विक्री होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकारांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करून अवैध दारूविक्रीला आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button