जळगाव

धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील : गुलाबराव पाटील

धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील : गुलाबराव पाटील

प्रत्येक प्रभागात संघटना मजबूत करण्याचे आवाहन; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वितरण

धरणगाव, प्रतिनिधी : धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि पुढेही राहील. हा बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिकाने एकजुटीने काम करावे. जनतेने १५ नगरसेवकांना निवडून दिले; मात्र नगराध्यक्षपद थोड्या मतांनी हुकले म्हणून खचून जाऊ नका. पराभवातून शिकून चुका सुधाराव्यात आणि नव्या ताकदीने पुन्हा उभे राहावे. संघटना हीच शिवसेनेची खरी ताकद असून, मजबूत संघटनेच्या बळावरच सत्ता मिळते, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना कार्यालयात शहर शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या

पदे मिरवण्यासाठी नसून जनतेची कामे करण्यासाठी आहेत. सत्ता ही जनतेचे भले करण्याची संधी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांनुसार प्रत्येकाने काम करावे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याने आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहावे. जुन्या व अनुभवी शिवसैनिकांचे मार्गदर्शन घ्यावे आणि दर महिन्याला संघटनात्मक बैठका घ्याव्यात. धरणगाव शहराच्या विकासासाठी आतापर्यंत निधीची कमतरता भासू दिली नाही आणि यापुढेही भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन करताना जळगाव व धरणगाव तालुक्यांतील उर्वरित नाला खोलीकरणाची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘जिल्हाप्रमुख आपल्या दारी’ या उपक्रमाचे कौतुक करून उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

संघटनेची मजबूत फळी उभी करा : प्रतापराव पाटील

युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याचे आवाहन केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून संघटनेची मजबूत फळी उभी करावी. नियमित बैठका आणि जनसंपर्कावर भर द्यावा. लवकरच पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. काम करताना चुका झाल्या तरी त्यातून शिकून पुढे जावे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनीही पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकद वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील आणि उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

उपशहरप्रमुखपदी कमलेश भगवान बोरसे, सुरेश भास्कर महाजन, संतोष वाल्मीक महाजन आणि अहेमद नबुवतखां पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. शहर संघटकपदी प्रभुदास रोहीदास जाधव, उपशहर संघटकपदी गोविंदा सुनील मनोरे आणि किशोर साहेबराव पाटील यांची निवड झाली.

शहर कार्याध्यक्षपदी रवींद्र रमेश महाजन, शहर उपकार्याध्यक्षपदी सुदर्शन सुरेश भागवत, शहर समन्वयकपदी नाना लोटन मराठे आणि उपशहर समन्वयकपदी हेमराज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. युवासेनेच्या शहरप्रमुखपदी कन्हैया महाजन यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शहरप्रमुख वीरेंद्र पुरभे यांनी धरणगाव शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक वाटचालीची आणि सद्यस्थितीची माहिती दिली. सूत्रसंचालन विभागप्रमुख रवी महाजन यांनी केले, तर माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी आभार मानले.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, जळगाव महानगरप्रमुख गणेश सोनवणे, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, शहरप्रमुख धीरेन्द्र पुरभे, उपनगराध्यक्ष विजय महाजन, गटनेते पप्पू भावे, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदासअप्पा विसावे, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी, विलास महाजन, पवन महाजन, बाळू जाधव, वासुदेव चौधरी आणि मोतीअप्पा पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button