चोपड्यात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात MIM कडून पोलिसांत तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

जळगाव मीडिया प्रतिनिधी: चोपडा (जि. जळगाव) :
सोशल मीडियावर पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौपडा तालुका MIM पक्षाच्या वतीने पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर एका व्यक्तीने पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांच्याबाबत कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ किंवा इतर सामग्रीची पडताळणी करावी. चौकशीत संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 नुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात धार्मिक भावना दुखावणे, समाजात तेढ निर्माण करणे व सार्वजनिक शांतता भंग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कृत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
MIM चोपडा तालुक्याच्या वतीने दिलेल्या या निवेदनाची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




