जळगाव

१३ वर्षीय तेजसच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक; पोलीस अधीक्षकांचे SIT स्थापन करण्याचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याची १६ जून रोजी मध्यरात्री अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, ही हत्या नसून नरबळीचा प्रकार असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शुक्रवारी (२७ जून) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडले.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या हत्येच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस महाजन १६ जून रोजी अचानक बेपत्ता झाला होता. काही दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला असून, गळ्यावर धारदार शस्त्राचे वार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करत संशयितांना अटक केली आहे. पुढील तपासात नरबळीच्या धाराही समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, तपासाची गती वाढवावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी पुढील मागण्या केल्या आहेत –

1. प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा,

2. नरबळीचा गुन्हा समाविष्ट करून सखोल तपास करावा,

3. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपींची तात्काळ अटक करावी,

4. प्रसिद्ध विधीविशारद उज्ज्वल निकम यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करावी,

5. प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी.

 

यातील तीन मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असून, उर्वरित दोन मागण्यांसाठी ग्रामस्थांनी शासन आणि पोलिसांकडे पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button