
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
“रणरणत्या उन्हात आमरण उपोषण करणार
मुंबई वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. येत्या ३० तारखेपासून अंतरवली सराटी येथे सुरू होणारे उपोषण अत्यंत कठोर स्वरूपाचे असेल, असा इशारा देताना “देशात असे उपोषण कधी झाले नसेल” असे विधान त्यांनी केले. यावेळी कोणताही मंडप उभारला जाणार नसून आपण थेट रणरणत्या उन्हात बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंतरवली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी भेट घेतल्यानंतरही आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. “मी सावलीत बसणार नाही. मे महिन्याच्या कडक उन्हातच आमरण उपोषण करणार आहे. उष्माघाताने माझा मृत्यू झाला तर त्याला सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,” असा थेट इशाराच त्यांनी दिला.
सरकारला वारंवार मुदत देऊनही निर्णय होत नसल्याने संताप वाढल्याचे त्यांनी सांगितले. “१६ तारखेपासून वेळ दिला, त्याआधी २९ ऑगस्टला मुंबईत आलो होतो, तेव्हापासून सरकारला संधी दिली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता सरकारचे मंत्री अंतरवलीत येऊन काय करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यास एवढा विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. “पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन नाही. सरकारला फक्त मराठ्यांची मते हवी आहेत का? गरीबांच्या प्रश्नांशी काही देणंघेणं नाही का?” अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी जरांगे यांनी समाजबांधवांना शांततेचे आवाहन केले. “मी तुमच्या लेकरांसाठी लढत आहे. पण कुणीही अंतरवली सराटीत येऊ नका. उद्रेक होऊ देऊ नका. आपल्याला आपलं हक्काचं आरक्षण शांततेने मिळवायचं आहे,” असे ते म्हणाले. “आपण संघर्ष करून साम्राज्य उभं करणारी औलाद आहोत. आपण देणारे आणि मिळवणारे आहोत, हे विरोधक विसरले आहेत,” असे सांगत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.



