
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महापूजा ; राज्यावरची संकटे दूर करा, बळीराजाला सुख, समाधान देण्याचे पांडुरंगाच्या चरणी साकडे
पंढरपूर, दि. ६ : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी पांडुरंगाच्या चरणी साकडे घालत, “राज्यावरची संकटे दूर करा, बळीराजाला सुख, समाधान आणि प्रत्येक नागरिकाला सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी द्या,” अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.
महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मानाचे वारकरी कैलास दामू उगले आणि सौ. कल्पना उगले यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, बाबासाहेब देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय सावकारे, देवेंद्र कोठे, अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वारीची परंपरा दरवर्षी अधिक व्यापक होत आहे. यावर्षी पायी चालत आलेल्या वारकऱ्यांची संख्या मोठी होती आणि विशेषतः तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली आहे. राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली जर्मन हॅंगरच्या माध्यमातून चांगली व्यवस्था उभारली आहे.”
वारीत प्रत्येक वारकरी इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही वारीची विशेषता आहे. भागवत धर्माची पताका उंचावत ठेवणारी ही परंपरा आपली संस्कृती किती समृद्ध आहे हे दाखवून देते. यावेळी निर्मल वारीद्वारे स्वच्छता आणि पर्यावरण पूरक वारी यशस्वी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचा उल्लेख करत सांगितले की, यावर्षी व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे सर्वसामान्य भाविकांना पाच तास लवकर दर्शन घेता आले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्ताविकेत सांगितले की, यावर्षी शासन व प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे वारकरी वर्ग अत्यंत समाधानी असून, वारी व्यवस्थापन योग्य प्रकारे हाताळले जात आहे.
महापूजेनंतर मानाचे वारकरी कैलास व कल्पना उगले यांचा मुख्यमंत्री व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून वर्षभराचा मोफत एसटी पासही त्यांना प्रदान करण्यात आला.
‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार वितरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारीत स्वच्छता व सामाजिक प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात आले.
प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी (क्रमांक १३, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा),
द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी (क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा),
तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी (क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा).
वारीत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.