
मुंबई (प्रतिनिधी): पूर्वीच्या शालेय शिक्षणपद्धतीत आणि आजच्या आधुनिक शिक्षणपद्धतीत जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. आधी शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास, शिस्त आणि यशाचा आग्रह होता, तर आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. छंद, कला, व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेक गोष्टी शालेय जीवनाचा भाग झाल्या आहेत. याच बदलाचा एक सुंदर उदाहरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
https://www.instagram.com/reel/DGk_0g6PQEt/?utm_source=ig_web_copy_link
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शिक्षक आपल्या दोन विद्यार्थिनींसोबत ‘उनसे मिली नजर’ या जुन्या बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ शाळेच्या बाहेरच्या परिसरातील असून, शिक्षक व विद्यार्थिनींचे तालात आणि हावभावात सुसंगतीने नृत्य करताना पाहायला मिळते.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शिक्षणातील सकारात्मक बदलाचे स्वागत केले आहे. यामधून स्पष्टपणे दिसून येतं की, शिक्षक आता विद्यार्थ्यांशी फक्त विषय शिकवण्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्यांच्या मनाशी नातं जोडून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. यामुळे वर्गातील वातावरण अधिक मोकळं, प्रेरणादायी आणि आनंददायी होत आहे.
या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि शेअर्स झाले असून, अनेकांनी शिक्षकाच्या या प्रयत्नाचे कौतुक केलं आहे. “अशा शिक्षकांमुळेच मुलांना शाळा आवडू लागते,” “हेच तर खरं शिक्षण!” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत.