गुन्हेजळगाव

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये तुफान हाणामारी

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये तुफान हाणामारी

जुन्या वादातून बराकीतच मारहाण; कैद्याच्या डोक्याला गंभीर दुखापत

जळगाव l प्रतिनिधी l अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या जळगाव जिल्हा कारागृहात दोन कैद्यांमधील वाद हिंसक वळणावर गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून बराकीतच झालेल्या मारहाणीत एका कैद्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी हल्लेखोर कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृहातील अंतर्गत सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बराक क्रमांक ८ मध्ये घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहातील बराक क्रमांक ८ मध्ये हा प्रकार घडला. वाल्मीक नगर परिसरातील २९ वर्षीय कैदी बराकीत असताना त्याच ठिकाणी बंदिस्त असलेला आरोपी कैदी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने जुन्या वादाच्या कारणावरून त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

काही वेळातच दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपी श्याम सूर्यवंशी याने संबंधित कैद्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने धक्काबुक्की करत पीडित कैद्याला थेट भिंतीवर ढकलून दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

रक्तबंबाळ अवस्थेत कैदी जखमी

भिंतीवर जोरात डोके आदळल्याने जखमी कैदी रक्तबंबाळ झाला. घटनेनंतर कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आरोपीने पीडित कैद्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर जखमी कैद्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहासारख्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी कैद्यांमध्ये अशा प्रकारे हाणामारी झाल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button