गुन्हेजळगाव

वरणगावजवळ भीषण अपघात; भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

वरणगावजवळ भीषण अपघात; भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

लस्सी पिण्यासाठी निघालेल्या आदिवासी पारधी कुटुंबावर काळाचा घाला; एका वर्षाच्या चिमुरडीसह चार जणांचा जागीच मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव : वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील बायपास रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत एक महिला, दोन तरुण आणि एका वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील आदिवासी पारधी समाजातील कुटुंबातील सदस्य दुचाकीने वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. वरणगाव बायपासवर पोहोचताच समोरून भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यावरील सर्वजण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांना मृत घोषित केले, तर चौथ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या दुर्घटनेत विजय शंकर काळे (वय १९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय १) यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. आपल्या आप्तस्वकीयांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रुग्णालय परिसरात शोककळा पसरली होती. या वेदनादायी दृश्याने उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले.

दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेला स्कॉर्पिओ चालकदेखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात धाव घेत तपास सुरू केला. संतप्त नातेवाईकांनी संबंधित वाहनचालकावर कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

या भीषण अपघातामुळे वरणगाव व परिसरात शोककळा पसरली असून एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button