पारोळा हादरले : महिलेवर शेतात ओढून नेऊन अत्याचार
माय-लेकीला जिवंत मारण्याची आणि आत्महत्येची धमकी ; गुन्हा दाखल

पारोळा हादरले : महिलेवर शेतात ओढून नेऊन अत्याचार
माय-लेकीला जिवंत मारण्याची आणि आत्महत्येची धमकी ; गुन्हा दाखल
पारोळा (प्रतिनिधी):तालुक्यातील अमळनेर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ एका २८ वर्षीय महिलेला गाठून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नराधमाने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेला आणि तिच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवंत मारण्याची तसेच पोलिसांत गेल्यास ‘आत्महत्या करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची’ भयानक धमकी दिली. या क्रूर प्रकारामुळे पारोळा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाद झाला, अन् बळजबरीने शेतात ओढून नेले…
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २८ वर्षीय महिला अमळनेर रस्त्यावरील एका ठिकाणी वास्तव्यास आहे. ९ जून २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी कृष्णा आनंदा घिसाडी (रा. मोढाळे, ता. पारोळा) याने पीडितेला अमळनेर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले.संशयित कृष्णा घिसाडी याने पीडितेला अश्लील शिवीगाळ करत, तिचा हात पकडून बळजबरीने जवळच असलेल्या एका शेतात ओढत नेले. तिथे तिची इच्छा नसताना, तिच्यावर जबरदस्तीने पाशवी अत्याचार केला.
पोलीसात गेल्यास आत्महत्या करीन!” – नराधमाची धमकी
अत्याचार केल्यानंतर नराधमाची विकृती इथेच थांबली नाही, तर त्याने पीडितेला पोलिसांत न जाण्यासाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने धमकी दिली की, “तू जर या प्रकाराबाबत पोलिसांना किंवा कोणाला सांगितले, तर मी आत्महत्या करीन आणि चिठ्ठीत तुझे नाव लिहून तुला खोट्या केसमध्ये अडकवीन.”
एवढेच नव्हे तर, “तू जर माझ्या नादी लागलीस, तर तुझ्यावर आणि तुझ्या १४ वर्षांच्या मुलीवर पुन्हा बलात्कार करीन व तुम्हा दोघांना जिवंत मारून टाकीन,” अशी क्रूर धमकीही त्याने दिली. या धमकीमुळे पीडित महिला प्रचंड हादरली होती.
पारोळा पोलिसांत ‘BNS’ अंतर्गत गुन्हा दाखल
या भयानक प्रसंगानंतर घाबरलेल्या पीडितेने अखेर हिंमत एकवटली आणि १० जून २०२६ रोजी रात्री २३:३५ वाजता पारोळा पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कृष्णा आनंदा घिसाडी याच्याविरुद्ध नवीन कायद्यानुसार *भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४, ११५(२), ३५२, ३५१(२)* अन्वये बलात्काराचा आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकविजय भोंबे करत आहेत.



