जळगाव

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’; मुक्ताईनगरातील पाच गावांवर पहाटेचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’; मुक्ताईनगरातील पाच गावांवर पहाटेचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’

सराईत गुन्हेगार जेरबंद; लाखो रुपयांची रोकड, वन्य प्राण्यांच्या कातडीसह मुद्देमाल हस्तगत

200 हून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून ‘ड्रॉप केस’सारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा, हलखेडा, माधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या पाच गावांवर जळगाव पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अभूतपूर्व कारवाई करत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ हे विशेष अभियान राबविले. जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या कारवाईत मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच आरसीपीच्या पथकांनी एकाचवेळी धाडसत्र राबवून अनेक संशयित आणि सराईत आरोपींना ताब्यात घेतले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

सोशल मीडियाद्वारे देशभरातील नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही गावे गेल्या काही वर्षांपासून विशिष्ट प्रकारच्या फसवणूक आणि लुटमारीच्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आहेत. अल्प लोकसंख्या असलेल्या या गावांमधून सोशल मीडियावर काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, अॅल्युमिनियम भंगार, जुने सोने, कॉपर, शंख आणि डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ प्रसारित करून देशभरातील नागरिकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

व्हिडिओंना भुलून या गावांमध्ये पोहोचणाऱ्या व्यक्तींना बनावट वस्तू, नकली नोटा किंवा खोट्या मौल्यवान वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांत कोणतीही वस्तू न देता थेट पैसे हिसकावून घेतले जातात, तर विरोध करणाऱ्यांना मारहाण करून लुटल्याच्याही घटना घडल्या आहेत.

‘ड्रॉप केस’ची धक्कादायक कार्यपद्धती

या गुन्हेगारीचा आणखी एक गंभीर पैलू म्हणजे काही पीडितांच्या जवळ बनावट हरणाचे किंवा वाघाचे कातडे ठेवून त्यांचे व्हिडिओ चित्रीत केले जातात. त्यानंतर “पोलिसांकडे तक्रार केल्यास वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवू” अशी धमकी देऊन त्यांना गप्प बसविले जाते. पोलिसांच्या भाषेत या संपूर्ण प्रकाराला ‘ड्रॉप केस’ म्हणून ओळखले जाते.

तीन वर्षांत गुन्ह्यांचा वाढता आलेख

मागील तीन वर्षांत या परिसरात दरोडा, खुनासह दरोडा, खून, जबरी चोरी, फसवणूक, दरोड्याचा प्रयत्न आणि सरकारी नोकरावर हल्ला अशा गंभीर स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पोलिसांच्या अभिलेखानुसार या पाच गावांमधील आरोपींची संख्या देखील लक्षणीय असून अनेक जण सराईत गुन्हेगार म्हणून नोंदविले गेले आहेत.

पहाटेचे नियोजनबद्ध धाडसत्र

या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी अत्यंत गोपनीय नियोजन करून पहाटेच्या सुमारास एकाचवेळी सर्व गावांमध्ये धाडसत्र राबविले. पोलिस अधिकारी, अंमलदार आणि आरसीपीच्या पथकांनी समन्वय साधत संशयितांच्या घरांवर छापे टाकले. या कारवाईदरम्यान अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्ह्यांची गंभीर पार्श्वभूमी

मागील तीन वर्षांत या परिसरात १० दरोडे, १ खुनासह दरोडा, १ खून, ७ जबरी चोरी, १६ फसवणुकीचे गुन्हे, १ दरोड्याचा प्रयत्न आणि २ सरकारी नोकरांवरील हल्ल्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या भागाकडे पोलिसांचे विशेष लक्ष होते.

गुन्हे दाखल; आरोपी ताब्यात

या कारवाईदरम्यान फरेज राजू पवार, रामजाने राईसाहेब भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले, रोहित सुदेश पवार यांच्यासह विविध आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच विलास नरविलाल पवार व अजय दादा पवार या पाहिजे आरोपींनाही अटक करण्यात आली.

मोठा मुद्देमाल जप्त

कारवाईत एकूण २० लाख रुपयांची रोकड, अंदाजे ३० लाख रुपयांचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ८ लाख रुपयांचे ४ किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, हरणाचे, कोल्ह्याचे व सशाचे कातडे, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. याशिवाय संशयास्पद स्वरूपाचा इतर मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

२०० पोलिसांचा सहभाग

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी तथा मुक्ताईनगरचे प्रभारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, महेश गायकवाड, निलेश गायकवाड, राहुल वाघ, आशिष लव्हांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, योगिता नारखेडे, मीरा देशमुख, अमितकुमार बागुल यांच्यासह सुमारे २०० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button