
आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी
रात्री चावडी बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या; घरकुल, आरोग्य, पाणीपुरवठा व शाळांबाबत दिल्या सूचना
जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी रावेर तालुक्यातील पेसा क्षेत्रातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत दुर्गम आदिवासी भागात दौरा करत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला व चावडी बैठकीत मांडण्यात आलेल्या समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
शुक्रवारी (दि. १९) झालेल्या या दौऱ्यात नायर यांनी रावेर पंचायत समिती आवारातील मेस, महिला व पुरुष स्वच्छतागृहांची पाहणी केली. यावेळी आवश्यक दुरुस्ती व स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पंचायत समिती आवारातील सुरू असलेल्या सभागृह व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या बांधकामांची पाहणी करून कामाचा दर्जा कायम राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर त्यांनी कुसुंबे खुर्द, पाल, सहस्त्रलिंग व खिरोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयांना भेटी देऊन विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. व्ही.बी. रामजी-६ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रे व नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या आणि अपूर्ण घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच संबंधित विभागांनी आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या शाळा खोल्यांचे बांधकाम तसेच भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्राच्या कामांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले.
खिरोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही त्यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील आरोग्य सुविधांचा आढावा घेत नागरिकांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश दिले.
दुर्गम आदिवासी भागात रात्रीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चावडी बैठकीत नागरिकांनी पाणीपुरवठा, आरोग्य, घरकुल व इतर मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या. त्यावर संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद मेढे, सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे, उपअभियंता योगेश इंगळे, सहाय्यक अभियंता कोमलसिंग राजपूत, तालुका पेसा व्यवस्थापक युनुस तडवी, आरएचई धीरज धनगर यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.




