जळगावराजकारणशासकीयसामाजिक

‘शेतकऱ्यांच्या हक्कांशी तडजोड नाही’; जळगाव विमानतळ विस्तारीकरणाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

‘शेतकऱ्यांच्या हक्कांशी तडजोड नाही’; जळगाव विमानतळ विस्तारीकरणाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

प्रकल्पग्रस्तांना न्याय, शेतरस्त्यांसह प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश; सौर पथदिव्यांसाठी ५ कोटींची मंजुरी

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण हा जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाचा प्रकल्प असला, तरी त्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, शेतरस्ते आणि ये-जा करण्याचे मार्ग तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव विमानतळ विस्तारीकरण आणि परिसरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. नशिराबाद, चिंचोली, उमाळा आणि कुसुंबा परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करत विकासकामे पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

जमीन मोजणी विलंब न लावता पूर्ण करण्याचे आदेश

विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक जमीन मोजणी प्रक्रियेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्यामुळे कोणताही अनावश्यक विलंब न करता मोजणी पूर्ण करावी आणि प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार मिळणारे लाभ व मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

शेतकऱ्यांसाठी १० फूट रुंदीचा प्रवेशमार्ग

विमानतळाच्या संरक्षण भिंतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचण येऊ नये म्हणून भिंतीलगत १० फूट रुंदीचा स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आले. यावर प्राधिकरणाने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

सौर पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी

अजिंठा चौफुली ते विमानतळ या मार्गावर सौर पथदिवे उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC) अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

₹६.६० कोटींच्या रस्ते प्रकल्पाला गती

चिंचोली–नशिराबाद–उमाळा या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण तसेच पुलाच्या बांधकामासाठी ६.६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून काम वेगाने सुरू आहे. ही कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. या विकासकामांबद्दल नशिराबाद नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.

थकीत मालमत्ता करावर १५ दिवसांत निर्णय

नशिराबाद नगर परिषदेकडे विमानतळ प्राधिकरणाचा १२.५० कोटी रुपयांचा थकीत मालमत्ता कर प्रलंबित असून, या विषयावर तोडगा काढण्यासाठी १५ दिवसांत स्वतंत्र संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (ऑनलाइन), आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, नशिराबाद नगराध्यक्ष योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी हर्ष त्रिपाठी, विविध विभागांचे अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button