
भोकरच्या स्टेट बँकेत ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली!
दोन तासांत चौघे जेरबंद; कारागृहात रचला होता दरोड्याचा कट
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील भोकर गावात भरवस्तीत असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेवर शनिवारी दुपारी सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी हेल्मेट आणि मास्क घालून बँकेत प्रवेश केला. रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक जयेश राणे यांना एअरगनचा धाक दाखवून लॉकर रूममध्ये नेले. विरोध झाल्यानंतर हवेत दोन राऊंड फायर करून दरोडेखोरांनी बँकेतील १६ लॉकर्समधील सुमारे ३५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोकड सहा बॅगांमध्ये भरून पळ काढला.
दोन तासांत चौघे जेरबंद
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी केली. ग्रामीण भागातील पोलीस पाटलांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चार संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
कारागृहात रचला दरोड्याचा कट
तपासादरम्यान या दरोड्याचा कट कारागृहात रचल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. खूनप्रकरणात २०२४ पासून कारागृहात असलेला गजानन पवार आणि जळगावमधील दुसऱ्या बँक दरोड्याच्या प्रकरणातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक यांची कारागृहात ओळख झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी चादरी विकणारे फेरीवाले बनून बँकेची रेकी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना अटक
या प्रकरणात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक, अंकुश श्रावण चव्हाण, गजानन राजेंद्र पवार आणि अंकुश तुळशीराम चव्हाण या चौघांना अटक करण्यात आली आहे. या दरोड्यामागील इतर बाबींचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत आहेत.




