जळगावसामाजिक

वंचितांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश! अभेद्या फाउंडेशनने तांबापुरात साजरी केली माणुसकीची दिवाळी!

जळगाव मीडिया न्यूज़ नेटवर्क

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि माणुसकीचा सण! मात्र, केवळ शोभेचे दिवे लावून तात्पुरता उजेड करण्यापेक्षा स्वतः ज्ञानाने प्रकाशमान होऊन समाजातील अज्ञानरूपी अंधकार दूर करा आणि ज्ञानरूपी दिवा लावा, असा प्रेरणादायी संदेश देत अभेद्या फाउंडेशनच्या वतीने जळगाव शहरातील तांबापुरा झोपडपट्टी परिसरात वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

शहरातील तांबापुरा हा कष्टकरी आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांचा परिसर आहे. या भागातील कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अभेद्या फाउंडेशनतर्फे ‘शिक्षणघर’ हा उपक्रम राबविला जातो. या माध्यमातून शाळाबाह्य आणि वंचित मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात.

यंदाच्या दिवाळीतही अभेद्या फाउंडेशनने शाळाबाह्य मुले, घरेलू कामगार महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आनंदाचा सण साजरा केला. फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टे चौधरी यांनी शिक्षणघरात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी संवाद साधला. यावेळी मुलांना दिवाळीनिमित्त मिठाई आणि फराळाचे वाटप करण्यात आले.

वंचित आणि उपेक्षित घटकांसोबत सण-उत्सव साजरे केल्याने एक वेगळे समाधान आणि नवप्रेरणा मिळते. समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाच्या क्षणांत सहभागी करून घेणे हीच खरी दिवाळी असल्याचा विश्वास वैशाली झाल्टे चौधरी यांनी छोटेखानी कार्यक्रमात व्यक्त केला.

तसेच आगामी काळात ‘शिक्षणघर’ उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देऊन जास्तीत जास्त मुलांपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दिवाळीनिमित्त मिळालेला फराळ आणि मिठाई यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अभेद्या फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ दिवाळी साजरी करण्यापुरता मर्यादित नसून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरला.

उपक्रमाचे नेतृत्व : वैशाली झाल्टे चौधरी
अभेद्या फाउंडेशन | शिक्षणघर | गुलाबी गँग सखी संचालिका, जळगाव

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button