जळगाव

नियतीचा क्रूर घाला! जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूने घेतला अखेरचा श्वास; काही तासांत एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

जळगाव मीडिया न्यूज़ नेटवर्क : मृत्यू कधी आणि कोणत्या रूपाने येईल, याचा नेम नसतो. मात्र, जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने माणुसकीच्या भावविश्वालाही हेलावून टाकले आहे. जावयाच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने व्यथित झालेल्या सासूचाही जावयाच्या अंत्यविधीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शहरातील बळीराम पेठ परिसरातील मलिक पार्क येथील रहिवासी मसूद शेख नवाज (वय ५९) यांचे दि. ९ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

जावयाच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून त्यांच्या सासू शकीला सलीम खान या मंगळवारी सकाळी जळगावात दाखल झाल्या होत्या. मात्र, जावयाच्या निधनाचे दुःख आणि घरातील शोकाकुल वातावरणामुळे त्या व्यथित झाल्या होत्या.

अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच प्रकृती खालावली!

दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बळीराम पेठेतील अल-अमीन अपार्टमेंट येथून मसूद शेख यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच शकीला खान यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली.

काही तासांत दोन मृत्यू; नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर!

एकीकडे जावयाला अखेरचा निरोप दिला जात असताना दुसरीकडे सासूच्या निधनाची बातमी समोर आली. या दुर्दैवी घटनेने उपस्थित नातेवाईकांना मोठा धक्का बसला. काही तासांच्या अंतराने एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मसूद शेख यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते कय्यूम नवाज यांचे लहान बंधू, तर पत्रकार जकी अहमद यांचे मामा होत.

शकीला सलीम खान यांच्या पश्चात पती, चार मुले, चार मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

एका कुटुंबातील दोन आधार हरपल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button