जळगाव एमआयडीसीत कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग
अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरातील एल सेक्टरमध्ये असलेल्या लल्लन यादव यांच्या कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कुलर निर्मितीसाठी वापरण्यात येणारे वाइंडिंग मोटर्स, गवत, लोखंडी पट्ट्या तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. कंपनीच्या शेजारीच केमिकल कंपनी असल्याने आग अधिक भडकण्याची व मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिका अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय गेंदालाल मिल येथील अग्निशमन वाहनानेही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत संपूर्ण आगीवर पाण्याचा मारा केला आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश मिळविले.
ही मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि केंद्र अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. आगीची तीव्रता लक्षात घेता जवानांनी अत्यंत धाडसाने काम करत आग शेजारील केमिकल कंपनीपर्यंत पोहोचू दिली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील जीवित आणि वित्तहानी टळली.
जवानांचे मोलाचे योगदान
आग विझविण्याच्या मोहिमेत वाहन चालक देविदास सुरवाडे, संजय भोईटे, युसुफ पटेल, प्रभाकर पाटील, शोएब तडवी आणि मयूर देसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.तसेच फायरमन ललित पाटील, संजय तायडे, यश मनोरे, वृषभ सुरवाडे, सुमित साळवे, जगदीश साळुंखे, शिवा तायडे, संदीप कोळी, सरदार पाटील, नितीन राठोड, रितेश उबाळे आणि शुभम पाटील यांनी धोकादायक परिस्थितीत जीवाची पर्वा न करता आग नियंत्रणात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
वेळीच नियंत्रणामुळे मोठे नुकसान टळले
आगीत कंपनीतील साहित्याचे नुकसान झाले असले तरी अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे आग केमिकल कंपनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले.अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या तत्परतेमुळे संपूर्ण परिसर सुरक्षित राहिला,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली




