
गणेश मंडळांना प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण
सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचा पुढाकार
जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक अग्निशमन उपाययोजनांची जनजागृती करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागामार्फत प्राथमिक स्वरूपाचे आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
मा. आयुक्त आदित्य जीवने (भा.प्र.से.) यांच्या आदेशान्वये तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जय गोविंदा मित्र मंडळ, विजसनी नगर; जय महाराष्ट्र मित्र मंडळ, नवीपेठ; श्री गर्जना मित्र मंडळ, नवीपेठ; पंचरत्न गणेश मंडळ, नवीपेठ या गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी आग लागल्यास घाबरून न जाता तात्काळ करावयाच्या उपाययोजना, अग्निशामक यंत्राचा योग्य वापर, आग विझविण्याच्या प्राथमिक पद्धती तसेच मंडप परिसरातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे दूरध्वनी क्रमांक तसेच इतर आवश्यक व उपयुक्त माहिती मंडळाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सव काळात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने संभाव्य आग दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे, आवश्यक अग्निशमन साधने उपलब्ध ठेवणे आणि स्वयंसेवकांना प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“सुरक्षित गणेशोत्सव, सुरक्षित जळगाव” या उद्देशाने अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाकडून गणेश मंडळांमध्ये अशा प्रकारच्या प्रशिक्षण व जनजागृती उपक्रमांवर भर देण्यात येत आहे.




