गुन्हे

कुंभमेळ्याचे नावावर ५०० कोटी फसवणुकीचा संशय; अधिकारींच्या बनावट नावाने टेंडर काढल्याचा आरोप

जळगाव मीडिया प्रतिनिधी : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट पद्धतीने ऑफलाइन निविदा व वर्क ऑर्डर तयार करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कुंभमेळ्यासाठी शासनाने स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली असून, संबंधित कामांची निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याची तरतूद आहे. मात्र, काही कामांमध्ये प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करून ऑफलाइन ऑर्डर तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
१५० कोटींच्या वर्क ऑर्डरवर प्रश्नचिन्ह
पोलिसांना जेवण पुरवठा, विविध साहित्याचा पुरवठा आणि इतर सेवांसाठी कोट्यवधी रुपयांच्या वर्क ऑर्डर काही ठेकेदारांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगण्यात येते.
बनावट वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या नावाखाली ठेकेदारांकडून मोठ्या रकमांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर?
या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री, कुंभमेळा आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित कामांसाठी अधिकृतरीत्या कोणतीही मागणी करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यास, शासनाच्या अधिकृत प्रक्रियेचा गैरवापर करून ठेकेदारांना फसविण्याचा प्रकार झाल्याचा संशय अधिक बळावतो.
मुंबईपासून नाशिकपर्यंत बनावट ऑर्डरचे जाळे?
यापूर्वीही अशाच पद्धतीने मुंबईतील काही व्यक्तींना फसविण्यात आल्याची माहिती समोर आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ठेकेदारांना गंडा घालणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कुंभमेळ्याच्या कामांशी संबंधित निविदा, वर्क ऑर्डर आणि अधिकृत कागदपत्रांची प्रशासनाने पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button