
खंडणी , ड्रग्स व गैरवर्तनाच्या प्रकरणामुळे आयजी दत्तात्रय कराळे यांचा कठोर कारवाईचा इशारा
जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलावरील खंडणी, ड्रग्ज व गैरवर्तनाच्या प्रकरणांमुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी २१ मे रोजी पोलिसांना कठोर इशारा दिला. पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, “चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही माफक वागणूक दिली जाणार नाही. दोषी आढळल्यास कठोर कारवाई अटळ आहे.”
कराळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील प्रलंबित व गंभीर गुन्ह्यांचा तपशीलवार आढावा घेतला. येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणांनी काटेकोर उपाययोजना राबवाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.
खंडणी व ड्रग्ज प्रकरणांवर विशेष लक्ष
कराळे यांनी स्पष्ट केले की, “खंडणी व अमली पदार्थ प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची सौम्यता बाळगली जाणार नाही. संबंधित आरोपी व त्यांच्या संपर्कात असलेल्यांवर त्वरित व कठोर कारवाई करण्यात यावी.”
गावठी कट्ट्यांविरोधात राबवलेल्या मोहिमेचे कौतुक
मध्य प्रदेश सीमेलगतच्या जंगल भागात अवैध शस्त्रनिर्मितीवर पोलिसांनी राबवलेल्या कारवाईचे कराळे यांनी विशेष कौतुक केले. या मोहिमेअंतर्गत अनेक बेकायदा शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. “अशा मोहिमा सातत्याने राबवाव्यात,” असेही त्यांनी आदेशित केले.
या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर तसेच सर्व विभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.