जळगाव

भुसावळात पोलिसांचा ‘थंडरबोल्ट’ अ‍ॅक्शन मोड! पहाटेच्या अंधारात कोम्बिंग ऑपरेशन; थेट गावठी कट्टा, काडतूस अन् तलवारींसह शस्त्रसाठा जप्त!

भुसावळात पोलिसांची पहाटेच्या अंधारात कोम्बिंग ऑपरेशन गा;वठी कट्टा, काडतूस अन् तलवारींसह शस्त्रसाठा जप्त!

९९ गुन्हेगारांची झाडाझडती, २३ संशयित वाहने जप्त तर लाखांचा दारूसाठा केला उद्ध्वस्त

भुसावळ: प्रतिनिधी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे कंबरडे मोडण्यासाठी भुसावळ पोलिसांनी थेट युद्धपातळीवर ‘महासर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. भुसावळ शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी बुधवारी (दि. १० जून २०२६) पहाटे ३ वाजेपासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत संपूर्ण शहराला वेढा घालत एकाच वेळी विशेष कोम्बिंग ऑपरेशन (Combating Operation) राबवले. या वादळी मोहिमेत जिवंत काडतुसासह गावठी कट्टा, धारदार तलवारी आणि घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. खाकी वर्दीच्या या अचानक आणि धडाकेबाज कारवाईमुळे भुसावळ शहरातील गुन्हेगारी जगतात, अवैध धंदेवाल्यांमध्ये आणि भाईगिरांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून संपूर्ण शहर पोलिसांच्या अ‍ॅक्शन मोडने थरारून उठले आहे.

पहाटे ३ वाजता नाकेबंदी; ९९ अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर!

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत गोपनीयरीत्या हा अ‍ॅक्शन प्लॅन आखला होता. पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या गुन्हेगारांना सावरण्याची साधी संधीही न देता पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत एकाच वेळी छापे टाकले. या मोहिमेत पोलिसांनी रेकॉर्डवरील तब्बल ९९ सराईत गुन्हेगारांची जागेवरच कसून तपासणी केली. तसेच ६३ संशयित आणि अट्टल बदमाशांच्या घरांची कोनाकोपरा पिंजून काढत झडती घेण्यात आली. या सर्व संशयितांची सखोल चौकशी करून पोलिसांनी त्यांचे गुन्हेगारी इतिहास सांगणारे विशेष ‘इंटरॉगेशन फॉर्म’ भरून घेतले आहेत, ज्यामुळे भविष्यातील गुन्ह्यांना आळा बसेल.

शस्त्रसाठा जप्त; आर्म्स अ‍ॅक्टनुसार ४ गुन्हे दाखल!

या कोम्बिंग ऑपरेशनमधील सर्वात मोठे यश म्हणजे पोलिसांनी गुन्हेगारांच्या अड्ड्यांवरून बेकायदेशीर घातक शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये १ घातक गावठी कट्टा (पिस्तूल), १ जिवंत काडतूस, २ धारदार तलवारी आणि १ धोकादायक कोयता जप्त करण्यात आला आहे. कोणत्याही मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले असून, याप्रकरणी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म्स अ‍ॅक्ट (शस्त्र कायदा) नुसार चार स्वतंत्र आणि गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

११२ वाहनांची तपासणी; चोरलेली दुचाकी जप्त अन् खंडवाचा फरार गुन्हेगार गजाआड!

मोहिमेदरम्यान शहराच्या सर्व अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवर लोखंडी बॅरिकेड्स लावून तगडी नाकेबंदी करण्यात आली होती. संशयास्पद वाटणाऱ्या ११२ वाहनांची जागच्या जागी तपासणी करण्यात आली; ज्यापैकी आवश्यक कागदपत्रे नसलेली आणि संशयास्पद वाटणारी २३ वाहने पोलिसांनी थेट जप्त केली आहेत. याच तपासणी दरम्यान, चोपडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ८४/२०२६ मधील चोरीला गेलेली एक मौल्यवान दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले. तसेच मध्य प्रदेशातील खंडवा येथील जीआरपी (रेल्वे पोलीस) पोलिसांना चकवा देऊन फरार असलेला एक अट्टल गुन्हेगारही भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात रंगेहात अडकला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

लाखांचा हातभट्टी दारूचा साठा जागीच खाक!

गुन्हेगारांसोबतच पोलिसांनी भुसावळ शहराच्या लगतच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवरही घाला घातला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा बेकायदेशीर दारूचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी गुन्ह्यासाठी तयार करून ठेवलेले रसायन आणि दारू बनवण्याचे साहित्य मानवी आरोग्याला घातक ठरू नये, म्हणून जागीच ओतून आणि पेटवून नष्ट केले.

२०० पोलिसांचा फौजफाटा; गुन्हेगारांना थेट इशारा!

भुसावळ शहरातील ही आजवरची सर्वात मोठी नाकेबंदी आणि मोहीम मानली जात आहे. या महामोहिमेची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक (तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या थेट नेतृत्वात २० वरिष्ठ पोलीस अधिकारी, २०० पेक्षा अधिक पोलीस अंमलदार आणि अत्यंत सज्ज असलेल्या ५ आरसीपी (दंगल नियंत्रण प्लाटून) तुकड्यांचा भलामोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवण्यात आला होता. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या या धडक कारवाईमुळे भुसावळ शहर आणि जिल्हाभरातील काळे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून “शहरात गुन्हेगारी कराल तर थेट तुरुंगात सडवले जाईल,” असा कडक आणि थेट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button