
कारण नसताना तरुणावर लोखंडी पट्टीने वार
आझादनगरातील घटना; भांडण सोडविण्यास आलेल्या आईलाही मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव, प्रतिनिधी : कोणतेही कारण नसताना चार जणांनी तरुणाला मारहाण करून लोखंडी पट्टीने वार केल्याची घटना आझादनगर परिसरात घडली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या आईलाही संशयितांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दि. ५ सप्टेंबर रोजी आझादनगर परिसरात अशपाक शेख (२९) यांच्यावर चौघांनी अचानक हल्ला केला. संशयितांनी त्यांना मारहाण करत लोखंडी पट्टीने वार केले. मुलाला वाचविण्यासाठी त्यांची आई मध्ये आली असता तिलाही मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी अशपाक शेख यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार योगेश माळी करीत आहेत.




