गुन्हे

पारोळा तालुक्यात खळबळ! जुन्या वादातून मित्रावर चाकूने हल्ला, पळासखेडे बु. येथे तरुणाचा मृत्यू मयूर दुर्वास पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव मीडिया पारोळा | प्रतिनिधी :
पारोळा तालुक्यातील पळासखेडे बु. येथे जुन्या वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाला हिंसक वळण मिळाले. वादादरम्यान एका तरुणाने दुसऱ्याच्या पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. गंभीर जखमी झालेल्या मयूर दुर्वास पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पळासखेडे बु. शिवारातील रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ मयूर पाटील आणि अंकुश नेहरू पाटील यांच्यात मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला.

यावेळी अंकुश पाटील याने पँटच्या डाव्या खिशातून चाकू काढून मयूरच्या पोटात वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात मयूर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी मयूरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५, व्यवसाय शेती, रा. पळासखेडे बु.) यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर संशयित आरोपी अंकुश नेहरू पाटील याचा शोध घेण्यासाठी पारोळा पोलिसांकडून पथके व तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

घटनेमुळे पळासखेडे बु. परिसरात खळबळ उडाली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button