जळगाव शहरातील बंद पोलिस चौक्या पुन्हा सुरू होणार का? वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी नागरिकांची मागणी

जळगाव मीडिया ( वसीम खान ) शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना आणि कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, शहरातील अनेक ठिकाणी बंद अवस्थेत असलेल्या पोलिस चौक्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आता सुशिक्षित नागरिकांकडून जोर धरत आहे.
पूर्वी पोलिस चौक्यांमुळे परिसरात पोलिसांची सतत उपस्थिती जाणवत होती. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास मिळत होता आणि गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होत होती. सध्या काही भागातील पोलिस चौक्या बंद असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
जळगाव शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता प्रत्येक भागात पोलिसांची उपस्थिती आणि तत्काळ प्रतिसाद यासाठी बंद पोलिस चौक्या सुरू करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी वर्गाच्या सुरक्षेसाठी ही पाऊल महत्त्वाचे ठरू शकते.
गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असले तरी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील बंद पोलिस चौक्या पुन्हा कार्यान्वित केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
आता नागरिकांचे लक्ष पोलीस प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले असून, जळगाव शहरातील बंद पोलिस चौक्या पुन्हा सुरू होणार का? हा प्रश्न कायम आहे.




