
नसरापूरचा ‘तो’ नराधम दोषी!
साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या कांबळेला २९ जूनला फाशी की जन्मठेप?
पुणे (विशेष प्रतिनिधी): नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिचा निघृण खून करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हा खटला ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत सरकारी पक्षाने आरोपीला थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला असून, २९ जून रोजी आरोपीला मृत्युदंड मिळणार की जन्मठेप, याचा अंतिम फैसला होणार आहे.
३९ मिनिटांत क्रूरतेचा कळस; शरीरावर १८ जखमा:
तपासादरम्यान समोर आलेली माहिती आणि वैद्यकीय अहवाल पाहून न्यायालयही सुन्न झाले. या नराधमाने अवघ्या ३९ मिनिटांच्या कालावधीत त्या चिमुकलीवर हे भीषण कृत्य केले होते. पीडित चिमुकलीच्या शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालात तिच्या शरीरावर तब्बल १८ गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. यावरून आरोपीच्या क्रूरतेची परासीमा स्पष्ट झाली.
आरोपीचा ‘तो’ लाजिरवाणा बचाव न्यायालयाने फेटाळला:
सुनावणीदरम्यान नराधम भीमराव कांबळे याने स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. “घटनेच्या दिवशी मी घायवळ यांच्या शेडमध्ये गेलो होतो, तिथे ती मुलगी आली. मी तिला गाठी-शेव खायला दिली. तिला गोठ्याकडे नेत असताना माझा पाय घसरला, त्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला आणि ती रडू लागली. म्हणून तिला खाटेवर झोपवून मी निघून गेलो,” असा धादांत खोटा दावा आरोपीने केला. मात्र, विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी वैद्यकीय पुरावे, घटनास्थळाची परिस्थिती आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या आधारे आरोपीचा हा खोटा बचाव न्यायालयात पूर्णपणे उखडून पाडला.
आरोपी हा विकृत; यापूर्वी जनावरावरही अत्याचार:
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शिक्षेच्या सुनावणी वेळी आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढाच वाचला. या नराधमावर यापूर्वी दोन महिलांवर अत्याचार केल्याचे गुन्हे नोंद आहेत, इतकेच नव्हे तर त्याने एका मुक्या जनावरावरही (पशू) अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा विकृत आणि अमानुष प्रवृत्तीला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ महत्त्वपूर्ण निकालांचे दाखले दिले व फाशीचीच मागणी लावून धरली.




