मध्य रेल्वेचा फुकट्या प्रवाश्यांना दणका; सुमारे ६ कोटींचा दंड वसूल
मध्य रेल्वेचा फुकट्या प्रवाश्यांना दणका; सुमारे ६ कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेचा फुकट्या प्रवाश्यांना दणका; सुमारे ६ कोटींचा दंड वसूल
विशेष तपासणी मोहिमेत ७८२ प्रकरणांवर कारवाई; प्रमुख स्थानकांवर कडक नजर
भुसावळ : प्रतिनिधी मध्य रेल्वेकडून विनातिकीट व अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, या कारवाईत सुमारे ६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भुसावळ रेल्वे विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या “विशेष तिकीट तपासणी अभियान” अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, जळगाव, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या प्रमुख स्थानकांवर एकत्रितपणे तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकूण ७८२ प्रकरणे नोंदवून सुमारे ५ कोटी ८६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रेल्वे कायद्याच्या कलम १४५ (ब) व १६७ अंतर्गत सात स्वतंत्र प्रकरणे दाखल करण्यात आली असून त्यातूनही दंड आकारण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवासाला आळा घालणे, प्रवाश्यांमध्ये नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण करणे आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्यास प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. या अभियानात ५८ तिकीट तपासणी कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सक्रिय सहभाग घेतला.
याशिवाय स्थानक परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या चार विक्रेत्यांविरोधातही कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवासात मोठी गर्दी होत असून अतिरिक्त गाड्याही सोडण्यात येत आहेत. या गर्दीचा गैरफायदा घेत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच सन्मानपूर्वक प्रवास करावा आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.




