
“घरकाम करणारीच निघाली चोर! ; ४ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
साथीदारालाही केली अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव | प्रतिनिधी मेहरूण तलाव परिसरातील घरफोडी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत घरकाम करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
मेहरूण तलाव परिसरातील लेकसाईड रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या सौ. सुधा प्रभुनाथ कावरा यांच्या घरातून तसेच समोरील तेजल पियुष संचेती यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना १२ जून रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
घरकामासाठी येणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले.
चौकशीत चोरीची कबुली
पोलिसांनी समताबाई धर्मराज धांडेकर (वय ४१, रा. येणुका नगर, जळगाव) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. तसेच धर्मराज हरिसिंग मीना (वय २८, रा. विदिशा, मध्यप्रदेश) याच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी धर्मराज मीनालाही अटक केली.
४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपींकडून २३.१० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस आणि ९.६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले असा एकूण ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीला गेलेले बहुतांश दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.
विश्वासाचा गैरफायदा; पोलिसांकडून तत्पर उलगडा
घरकामाच्या निमित्ताने मिळालेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र एमआयडीसी पोलिसांनी वेगवान आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना गजाआड केले.
“गुन्हेगार कितीही शिताफीने गुन्हा करण्याचा प्रयत्न करत असले तरी तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पर्दाफाश होणारच,” असे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.»




