गुन्हेजळगावराजकारणसामाजिक

पाळधी-तरसोद बायपासवरील रस्ता खचल्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश

पाळधी-तरसोद बायपासवरील रस्ता खचल्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश

मुसळधार पावसामुळे रस्त्याचा भाग खचला; बांधकामाच्या गुणवत्तेवर संशय, पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील पाळधी-तरसोद बायपास मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून, प्राथमिक निरीक्षणात रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यापूर्वीही या प्रकल्पाच्या कामाबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

घटनास्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, लालचंद पाटील, पिंटू पाटील तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच खचलेल्या भागाची त्वरित दुरुस्ती, रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी आणि संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button