
बनावट कागदपत्रांच्या आधारे ३१ लाखांची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज मिळवून संबंधित मालमत्ता दुसऱ्याला विकल्याच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ३१ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडगाव (ता. जामनेर) येथील योगेश भाऊराव गवांदे व भाग्यश्री भाऊराव गवांदे या दाम्पत्याने ८ जून २०२२ रोजी फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेसच्या जळगाव कार्यालयातून १४ लाख ४३ हजारांचे कर्ज घेतले. सुरुवातीला काही हप्ते भरल्यानंतर त्यांनी थकवा केला. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता गहाण ठेवलेल्या मालमत्तेची कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.
तसेच पाचोरा येथील आकाश गोरख पाटील व त्यांचे कुटुंबीय – वडील गोरख पाटील, आई सुनीता पाटील व पत्नी पूजा आकाश पाटील – यांनी त्याच दिवशी (८ जून २०२२) १७ लाख १९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जासाठी मालमत्ता तारण ठेवली होती. काही काळ हप्ते भरल्यानंतर त्यांनीही थकवा केला. चौकशीदरम्यान ही तारण मालमत्ता परस्पर विकल्याचे आढळले
या प्रकरणी फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तक्रारीवरून संबंधित सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.