जळगाव

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी

दानपेटीतील ३० ते ३५ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास; पाच दिवसांत चोरीची दुसरी घटना

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी

दानपेटीतील ३० ते ३५ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास; पाच दिवसांत चोरीची दुसरी घटना

अमळनेर, दि. २९ (प्रतिनिधी) : मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना २८ ऑगस्टच्या रात्री उघडकीस आली. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करत दानपेटी व कपाटांची तोडफोड केली. त्यानंतर देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच दानपेटीतील अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

मंदिर सकाळी उघडण्यासाठी गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. मुख्य दरवाजाचे लॉक तुटलेले, दानपेटीची तोडफोड झालेली आणि कपाटे उघडी व आतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. पाहणीत मातेच्या अंगावरील दोन हार, अंदाजे एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या टिकल्या आणि अंदाजे पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या चोरीस गेल्याचे समोर आले.

या घटनेप्रकरणी पत्रकार तथा अर्जदार हितेंद्र जगन्नाथ बडगुजर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी पंचनामा करून ठसे व इतर भौतिक पुरावे जतन करावेत, तसेच मंदिर परिसरासह आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाच दिवसांत दुसरी चोरी

मातोश्री नगर परिसरात अवघ्या पाच दिवसांत चोरीची ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button